दरवर्षी सणासुदीच्या काळात पुणे विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होते. प्रवाशांना आरक्षण मिळणे कठीण होते आणि प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात गैरसोयी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्सव विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत.
रेल्वेचे विभागीय वाणिज्य अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येण्यासाठी 25 आणि जाण्यासाठी 25 अशा एकूण 50 उत्सव विशेष गाड्या धावतील. 24 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत या गाड्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त उपलब्ध राहतील. त्यामुळे पुण्यातील प्रवाशांना दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी अतिरिक्त सुविधा मिळणार आहेत.
advertisement
या विशेष गाड्या दानापूर, गोरखपूर, दिल्ली, नागपूर, कोल्हापूर, वीरांगणा लक्ष्मीबाई झांशी, लातूर, संगानेर, कलबुर्गी, अजमेर, गाझीपूर, हिसार, बिकानेर, साईनगर शिर्डी आदी प्रमुख ठिकाणी धावणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह उत्तर आणि मध्य भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
या गाड्यांच्या घोषणेमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पुणे विभागातून इतक्या मोठ्या प्रमाणावर गाड्या उपलब्ध होत असल्याने आरक्षणासाठी होणारी धांदल कमी होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या उत्सव विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सणांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या गर्दीला तोंड देण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी घेतलेला हा निर्णय सणासुदीच्या काळातील प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.