रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे अपडेट्स
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारीपासून प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगच्या कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे पुणे-सोलापूर आणि पुणे-अमरावती यांसारख्या वर्दळीच्या मार्गावरील प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी स्थानकावर जाण्यापूर्वी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या (१४ ते २५ जानेवारी दरम्यान)
advertisement
प्रामुख्याने पुणे आणि सोलापूर दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या या काळात रद्द राहतील.
पुणे-सोलापूर एक्स्प्रेस (गाडी क्र. १२१६९/१२१७०)
सोलापूर-पुणे इंटरसिटी (गाडी क्र. १२१५७/१२१५८)
पुणे-सोलापूर आणि सोलापूर-पुणे डीईएमयू (गाडी क्र. ११४१७/११४१८) आणि पुणे-दौंड डीईएमयू (गाडी क्र. ७१४०१/७१४०२) या गाड्यांचा समावेश आहे.
२३ ते २६ जानेवारी दरम्यान पुणे-अमरावती एक्स्प्रेस (गाडी क्र. ११०२५/११०२६)
अमरावती-पुणे एक्स्प्रेस (गाडी क्र. १२११९)
अजनी-पुणे एक्स्प्रेस (गाडी क्र. १२१२०)
निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस (गाडी क्र. ११४१०)
पुणे-नागपूर गरीब रथ (गाडी क्र. १२११३/१२११४)
पुणे-नांदेड एक्स्प्रेस (गाडी क्र. १७६२९/१७६३०) या गाड्या देखील धावणार नाहीत.
मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या
ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या वळविण्यात आल्या आहेत. यशवंतपूर-चंदीगड एक्स्प्रेस, जम्मूतवी-पुणे एक्स्प्रेस आणि हजरत निजामुद्दीन-वास्को-द-गामा या गाड्या मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा मार्गे पुणे गाठतील. तसेच सातारा-दादर एक्स्प्रेस जेजुरी मार्गे आणि तिरुवनंतपुरम-सीएसएमटी एक्स्प्रेस कुर्डुवाडी-मिरज मार्गे वळवण्यात आली आहे.
शॉर्ट टर्मिनेशन आणि प्रवासातील बदल
काही गाड्या दौंडपर्यंत न जाता आधीच्या स्थानकावरच थांबवण्यात येतील. इंदूर-दौंड एक्स्प्रेस आणि ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेसचा प्रवास खडकी येथेच संपेल. परतीच्या प्रवासात २४ आणि २५ जानेवारीला दौंड-इंदूर एक्स्प्रेस दौंड ऐवजी पुणे येथून दुपारी १५:३३ वाजता सुटेल, तर दौंड-ग्वाल्हेर एक्स्प्रेस २५ जानेवारीला खडकी स्थानकावरून मध्यरात्री ००:२५ वाजता प्रस्थान करेल.
