पुणे : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर लेकीच्या साखरपुड्यानंतर आता पुन्हा चर्चेत आले आहे. पुण्यात एका कीर्तनादरम्यान इंदुरीकर महाराज आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काळेपडळ परिसरात काल रात्री कीर्तनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली. कार्यक्रमाच्या वेळी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक पोलीस आणि इंदुरीकर महाराज यांच्यात थेट बाचाबाची झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
शुक्रवारी रात्री काळेपडळ परिसरात इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कीर्तनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिल्याने परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांग लागली. यामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या वाहतूक पोलिसांनी आयोजकांकडे नाराजी व्यक्त केली. याच दरम्यान वाहतूक पोलिस आणि इंदुरीकर महाराज यांच्यात शाब्दिक वाद झाला.
मंचाजवळ गोंधळाचे वातावरण
तुमच्या किर्तनामुळे या परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे, असा आरोप वाहतूक पोलिसांनी इंदुरीकर महाराज यांच्यावर केला. यावरून काही काळ मंचाजवळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच कार्यक्रमाचे आयोजक तत्काळ मध्यस्थीला पुढे आले. आयोजकांनी दोन्ही बाजूंशी चर्चा करत परिस्थिती शांत केली. पोलिसांना बाजूला घेत गैरसमज दूर करण्यात आला आणि वाद मिटवण्यात आला.
दरम्यान, या वादाचा परिणाम कार्यक्रमावरही झाला. नियोजित वेळेपेक्षा सुमारे एक तास उशिराने कीर्तनास सुरुवात झाली. वाहतूक कोंडी कमी झाल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच कार्यक्रम सुरू करण्यात आला.
वाहतूक कोंडीनंतर मोठा गोंधळ
या घटनेनंतर परिसरात मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावेळी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. भविष्यात अशा कार्यक्रमांसाठी आयोजकांनी पोलिस प्रशासनाशी समन्वय साधूनच नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
