एका फोनमुळे झाला खुलासा
कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मधु एच. ए. याने ३० नोव्हेंबरच्या रात्री मंजुळा नावाच्या महिलेची चाकूने गळा आणि पोटावर वार करून हत्या केली होती. मंजुळा आणि मधु यांच्यात एक लाख रुपयांच्या आर्थिक वादातून भांडण झाले आणि रागाच्या भरात आरोपीने हे कृत्य केले. खून केल्यानंतर आरोपीने आपला मोबाइल बंद करून थेट बेंगळुरूहून शर्मा ट्रॅव्हल्सच्या बसने पुण्यात पळ काढला.
advertisement
तो ट्रॅक होऊ नये यासाठी त्याने फोन बंद ठेवला. मात्र, त्याने बसमध्ये एका सहप्रवाशाच्या फोनवरून आपल्या वडिलांना दोन वेळा कॉल केले. त्यावेळी कर्नाटक पोलिसांनी त्याच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आरोपीला याची कल्पना नव्हती.
ट्रॅव्हल्स एजन्सी आणि पोलिसांचा समन्वय
सहप्रवाशाच्या फोनच्या लोकेशनच्या आधारावर कर्नाटक पोलिसांना बसचा क्रमांक आणि ट्रॅव्हल्स कंपनीची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ ट्रॅव्हल्स एजन्सीशी संपर्क साधून बसच्या ड्रायव्हरला आरोपीवर नजर ठेवण्याची सूचना दिली. ड्रायव्हरने आरोपीला संशय न येऊ देता पोलिसांना माहिती पुरवली.
कर्नाटकचे एसपी अशोक के. व्ही. यांनी पुणे पोलिसांचे डीसीपी निखिल पिंगळे यांच्याकडे मदत मागितली. माहिती मिळताच डीसीपी पिंगळे यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि वाहतूक पोलीस अंमलदार रवींद्र बोराडे यांना बस थांबवण्याची जबाबदारी दिली.
कात्रज चौक ठरला ठिकाणा
बुधवारी (१ डिसेंबरला) सकाळी सुमारे १० वाजता बस कात्रज चौकात पोहोचताच, वाहतूक अंमलदार रवींद्र बोराडे यांनी बस थांबवली. कर्नाटक पोलिसांनी पुरवलेल्या एफआयआरच्या माहितीनुसार, त्यांनी सीट क्रमांक ५ वर बसलेल्या आरोपी मधु एच. ए. याला ओळखले आणि ताब्यात घेतले.
त्याला तात्काळ भारती विद्यापीठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले. यानंतर कर्नाटक पोलीस टीम पुण्यात दाखल झाली आणि त्यांनी शिवाजीनगर सत्र न्यायालयाकडून आरोपीचा ट्रान्झिट रिमांड मिळवला. इन्स्पेक्टर राघवेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक येथील कोर्टात हजर केले जाईल.
