पुण्याचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. कसबा गणपतीच्या स्वयंभू मूर्तीवर शेंदूराचा लेप काढण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारपासून (15 डिसेंबर) 15 ते 20 दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक ठकार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मंदिराच्या 450 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदिर बंद राहणार असल्याचा दावा त्यांनी केला. श्री. कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने हे काम केले जाणार आहे. जोपर्यंत मंदिराचे काम संपूर्णपणे पूर्ण होत नाही, तो पर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिर बंद असलेल्या दिवसांमध्ये, मुर्तीची शेंदूर कवच दुरूस्ती केली जाणार आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत आहे. ग्रामदैवत श्री. कसबा गणपती लाखो गणेशभक्तांचे नवसाला पावणारे आराध्यदैवत आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही दुर्धर प्रसंग उद्भवू नये, मुर्तीला कुठलीही इजा पोहोचू नये, म्हणून सध्या असलेले शेंदूर मिश्रीत कवच काळजीपूर्वक काढून पुन्हा शास्त्रोक्त पद्धतीने लावले जाणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असल्याने मंदिर पूर्ण बंद ठेवावे लागणार असल्याचा मंदिर ट्रस्टकडून एकमताने घेण्यात आला आहे. शेंदूर मिश्रीत कवच काढणे आणि तो व्यवस्थित पुन्हा लावणे हे काम फार संवेदनशील आहे, त्यामुळे या कामाला तीन आठवडे लागण्याची शक्यता आहे.
कदाचित या कामासाठी वेळ जास्तही लागू शकतो किंवा कमीही लागू शकतो. याचा अंदाज प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरच कळेल. कामाचा आढावा घेऊनच मंदिर केव्हा पर्यंत भाविकांसाठी सुरू होईल, याचे उत्तर मिळेल. कसबा गणपतीच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर, पुण्यातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक असलेले आणि ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. श्री. कसबा गणपती मंदिराचा इसवी सन 1614 पासून इतिहासात उल्लेख आढळून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी कसबा गणपतीचे जय मिळवून देणारा 'जयति गजानन' असे वर्णन केले होते. पुण्याच्या आसपासच्या सर्व गणेशोत्सवामध्ये प्रथम पूजा याच कसबा गणपतीची केली जाते. कसबा गणपतीच्या दर्शनाला फक्त पुण्यातूनच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रातून आणि संपूर्ण देशातून लाखो भाविक येत असतात.
