सरनाईक यांनी पुण्यातील दौऱ्यादरम्यान लोणावळा, शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकांना भेट देऊन स्वच्छता, सुविधा आणि सुरक्षिततेची पाहणी केली. यावेळी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, शिवाजीनगर बसस्थानकाची काही जागा महामेट्रोला करारानुसार दिली गेली होती, ज्यामुळे दोन्ही विभागांमध्ये काही विसंवाद निर्माण झाला होता. मात्र, आता शिवाजीनगर बस स्थानकाचे पूर्णपणे नूतनीकरण महामेट्रो कडूनच केले जाईल,असे त्यांनी सांगितले.
advertisement
सरनाईक म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपासून शिवाजीनगर बसस्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित असल्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे आरे डेअरीच्या जागेवर असलेल्या वाकडेवाडी बसस्थानकावर प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी तीन वर्षांच्या मुदतीसाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव संस्थेकडे पाठविण्यात येणार आहे.
त्याचबरोबर भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या आणि त्यासाठी चार्जिंग सुविधा लक्षात घेता, शिवाजीनगर बसस्थानकाची पीपीपी तत्त्वानुसार संपूर्ण विकास योजना तयार करण्यात येत आहे. नवीन बस स्थानकात प्रवाशांसाठी आधुनिक वेटिंग हॉल, , इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉइंट्स आणि स्वच्छता आणि सुरक्षा यासारख्या सुविधा समाविष्ट असतील.
सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, स्वारगेट बस स्थानकासाठी देखील सार्वजनिक-खासगी भागीदारीतून सुविधा सुधारण्यात येणार असून, या दोन्ही स्थानकांमुळे पुण्यातील बस प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल. तीन वर्षांच्या आत दोन्ही बस स्थानकांचा नूतनीकरणाचा काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या नव्या प्रकल्पामुळे पुण्यातील नागरिकांना केवळ प्रवास सोपा होणार नाही, तर शहरातील वाहतूक व्यवस्थेतही मोठा बदल होईल, अशी अपेक्षा आहे.