मंगळवारी रात्री भंडारदरा धरणातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले. यामुळे नदीवरील रस्ते पाण्याखाली गेला आणि सर्व वाहतूक बंद झाली. त्याच वेळी पुणे-सोलापूर महामार्गावरील लांबोटी परिसरातही पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. परिणामी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. महापूर झाल्यामुळे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे मार्गही तात्पुरते बंद करण्यात आला होता.
advertisement
जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द आणि कोणत्या उशिराने?
या काळात पुणे आणि सोलापूर विभागातील अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. सीएसएमटीवरून येणाऱ्या नागरकोईल, बंगळुरू एक्स्प्रेस आणि दक्षिणेकडून मुंबईला येणाऱ्या गाड्यांना सोलापूर, गुंठकल, हुबळी या विभागांमध्ये थांबवण्यात आले. परिणामी रेल्वे गाड्यांना सुमारे 10 ते 12 तास उशीर झाला.
विशेषतहा नागरकोईल, होस्पेट एक्सप्रेस, हुसेनसागर सुपरफास्ट, सिकंदराबाद दुरांतो, सिद्धेश्वर, लिंगमपल्ली सुपरफास्ट, शताब्दी एक्सप्रेस, सोलापूर इंटरसिटी, भुवनेश्वर सुपरफास्ट, उद्यान, एमजीआर चेन्नई एक्सप्रेस, मथुराई साप्ताहिक एक्सप्रेस, कोणार्क, सिकंदराबाद-मुंबई एक्सप्रेस या 15 ते 20 गाड्यांना 8 ते 10 तास उशीर झाला. वंदे भारत आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर-मुंबई दरम्यान रद्द करण्यात आल्या. त्यामुळे पुणे ते सोलापूर दरम्यान प्रवाशांना प्रचंड गैरसोय झाली.
चेन्नई सेंट्रल ते मुंबई तसेच पुणे-कन्याकुमारी एक्सप्रेस गाड्या लातूर रोड मार्गे कलबुर्गी जंक्शनकडे वळवण्यात आल्या तर बंगळुरू, सिकंदराबाद, चेन्नई, नागरकोईल एक्सप्रेस विविध विभागांमध्ये थांबवण्यात आल्या. मंगळवारी मध्यरात्री सोलापूर-पुर्ण महामार्गावरही पाणी आले होते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला.
एसटीलाही पुराचा फटका?
एसटी बस सेवाही प्रभावित झाल्या. पुणे एसटी विभागातून सोलापूर, लातूर, धाराशिव, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, उदगीर, बीड, विजापूर या शहरांकडे जाणाऱ्या बस सर्व्हिसेस मोहोळ नंतर थांबवण्यात आल्या. बुधवारी दुपारी पाणी ओसरल्यावर हळूहळू बस सेवा सुरू करण्यात आली परंतु काही फेऱ्या रद्द होत्या. एकूण 200 एसटी बस फेऱ्या रद्द केल्या गेल्या.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे गाड्या दोन्ही बाजूंनी थांबवण्यात आल्या होत्या. महापुरामुळे रुळावरून प्रवास धोक्याचे ठरू शकत होते. पाण्याचा जोर ओसरल्यानंतर रेल्वे रुळाची सुरक्षितता तपासून टप्प्याटप्याने गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या. हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग यांनी सांगितले की, ''सुरक्षितता हा आमचा प्राधान्य आहे. त्यामुळे सर्व निर्णय वेळेवर घेण्यात आले आणि प्रवाशांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी रेल्वे आणि महामार्ग मार्ग तात्पुरते बंद ठेवले''.