नेमका प्लॅन काय आहे?
यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने 12+1 आसन क्षमतेच्या वाहनांना शाळेच्या व्हॅनचा परवाना देण्याची घोषणा केली आहे. यानुसार, या व्हॅनमध्ये 12 विद्यार्थी आणि एक चालक बसवता येईल. ही व्हॅन ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड AIS-204 नुसार तयार केली जाईल आणि शालेय वाहने म्हणून मान्यता मिळेल. याआधी शालेय वाहनांसाठी मोठ्या बसची मर्यादा होती, ज्यामुळे छोट्या वाहनांना परवानगी नव्हती. आता पालकांना लहान व्हॅनमधूनही मुलांचा प्रवास सुरक्षित करता येईल.
advertisement
मुलांसाठी नव्या व्हॅनमध्ये सुरक्षिततेवर विशेष लक्ष
नव्या व्हॅनमध्ये सुरक्षा सुविधांवर विशेष भर दिला गेला आहे. जीपीएस ट्रॅकिंगच्या माध्यमातून वाहनाचे नेमके स्थान पालकांना समजेल तर सीसीटीव्हीमुळे प्रत्येक क्षणाची नोंद राहील. पालकांना डॅशबोर्ड स्क्रीनवरून थेट मॉनिटरिंग करता येईल, ज्यामुळे प्रवासाच्या दरम्यान मुलांवर नजर ठेवणे शक्य होईल.
सुरक्षेच्या दृष्टीने इतर उपाययोजना देखील राबवण्यात आल्या आहेत. अंबरनाथ येथे अलीकडेच घडलेल्या घटनेत वाहनाचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचा धोका वाढला होता. यामुळे नव्या व्हॅनमध्ये दरवाजा उघडल्यास अलार्म यंत्रणा बसवली जाईल. याशिवाय अग्निशमन अलार्म आणि फायर सप्रेशन स्प्रिंकलर्स अनिवार्य असतील, ज्यामुळे कुठलाही अग्निकांड किंवा इतर अनपेक्षित अपघात त्वरित लक्षात येईल.
शासनाच्या या निर्णयामुळे पालकांची मानसिक धाकधूक कमी होणार आहे आणि मुलांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. लहान, अत्याधुनिक व्हॅनमुळे शहरातील शालेय वाहतूक अधिक सोपी, सोयीस्कर आणि सुरक्षित होईल. या व्हॅनमुळे मुलं वेळेत आणि सुरक्षितपणे शाळेत पोहोचतील, तर पालकांना सतत चिंतेत राहावे लागणार नाही.