केंद्रीय शासनाने या समस्येचा निराकरण करण्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मंजुरी मिळाल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यानुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक जलद करण्यासाठी नऱ्हे ते देहूरोड दरम्यान एलिव्हेटेड कॉरीडॉर उभारण्यास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मंजुरी दिली आहे.
advertisement
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, हा प्रकल्प दोन टप्प्यात पार पडणार आहे. पहिला टप्पा देहूरोड-पाषाण-सूस मार्गावर असेल, तर दुसरा टप्पा पाषाण-सूस-नऱ्हे मार्गावर सुरू होईल. या मार्गांवर वाहतूक जलद होण्यासाठी तसेच शहरातील कोंडी टाळण्यासाठी ही रचना अत्यंत महत्त्वाची ठरेल.
हा प्रकल्प लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. नऱ्हे-नवले पूल ते वारजे आणि चांदनी चौक ते रावेत दरम्यान पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक जलद करण्यासाठी ही रचना अत्यावश्यक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे, हडपसर ते यवत मार्गावरही एलिव्हेटेड कॉरीडॉर उभारण्याच्या कामाला गती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मार्गावरील वाहतूक सुलभ झाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचा दैनंदिन प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित होईल, असे खासदार सुळे यांनी नमूद केले.
या प्रकल्पामुळे केवळ वाहतूक सुधारेल असे नाही, तर परिसरातील नागरिकांचे वेळेचे आणि मनस्तापाचे मोठे नुकसानही टळेल. पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी ही योजना एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.