पुणे : उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग बिबट्याच्या हालचालींमुळे सतत चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिरूर, आळेफाटा, जुन्नर, मंचर परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी शेतात काम करणाऱ्या महिलांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील महिलांनी स्वसंरक्षणासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.
advertisement
गावातील महिलांनी बिबट्याच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी आपल्या गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घालायला सुरुवात केली आहे. हा पट्टा लोखंडी किंवा जाड रबराच्या पट्टीसारखा असून त्यावर छोट्या-छोट्या टोकदार खिळ्यांचा थर बसवण्यात आला आहे. बिबट्या प्रामुख्याने मानेवर झडप घालून हल्ला करतो, त्यामुळे जर गळ्यात असा पट्टा असेल तर तो हल्ला निष्फळ ठरू शकतो, असा महिलांचा समज आहे. ही कल्पना त्यांनी गावातील काही तरुणांसोबत चर्चेतून प्रत्यक्षात आणली असून, सध्या गावातील अनेक महिला हा ‘खिळ्यांचा पट्टा’ वापरत आहेत.
कशी सुचली कल्पना?
आम्ही रोज शेतात कामाला जातो, बिबट्याची भीती सतत वाटते. मग विचार केला की काहीतरी उपाय करायला हवा. प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही, त्यामुळे आम्हीच हा पट्टा तयार केला, असं पिंपरखेडच्या एका महिलेनं सांगितलं. आमच्यासमोर बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. त्यावेळी जीव वाचवणाऱ्या कुत्र्याचा संघर्ष आम्ही पाहिला होता बिबट्याने कुत्र्याची मान पकडण्याचा प्रयत्न केला पण खिळ्यांमुळे आमचा कुत्रा वाचला. आम्ही गवत खुरपताना कधी बिबट्या मागून हल्ला करेल सांगता येत नाही, म्हणून आम्ही गळ्याला पट्टा बांधला आहे, असेही एका महिलेने सांगितलं.
ग्रामस्थांकडून तीव्र संताप
ग्रामीण भागात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये अजूनही भीती कायम आहे. त्यामुळे महिलांचा हा ‘खिळ्यांचा पट्टा’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. काहीजण त्याला स्वसंरक्षणाची जुगाड कल्पना मानतायत, तर काहींनी यामध्ये धोका असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. शेतात काम करतानाही सुरक्षित राहण्यासाठी महिलांनी घेतलेला हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या धैर्याचं आणि जिद्दीचं उदाहरण ठरत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांपासून स्वतःचं रक्षण करण्याचा हा नवाच ‘महिला उपाय’ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
