मागील तीन दिवसात पुणे शहराच्या विविध भागात बिबट्याचा वावर आढळला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेवाळवाडी आणि मांजरी परिसरात लोकांना दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यात घबराटीचं वातावरण आहे, अशात शहरातही आता बिबट्या शिरल्याने त्याला लवकरात लवकर जेरबंद करावं, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवडाभरापासून फुरसुंगी, मांजरी, शेवाळेवाडी आणि वडकी परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. गेल्या आठवड्यात फुरसुंगी जवळील सोनारपूल परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे काही नागरिकांनी सांगितलं होतं. त्यानंतर दोन-तीन दिवसातच मांजरी शेवाळवाडी परिसरातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ भावरावस्ती भागात परवा रात्री आणि दुपारी दीडच्या सुमारा रस्ता ओलांडत असताना बिबट्या दिसल्याचे ओंकार घाडगे यांच्यासह काही नागरिकांनी सांगितले.
स्थानिक तरुणांनी तातडीने त्याचा फोटो काढून पोलिसांना पाठवला. हडपसर पोलीस ठाण्याचे प्रमुख संजय मोगले व वनपाल शीतल खेंडके यांना तातडीने घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात पाहणी केली. यावेळी इथं बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस व वनाधिकाऱ्यांनी केलं आहे.
