नेमकी कशी घडली ही 'चमत्कारी' घटना?
नितीन शहा यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा कानातील हिऱ्याचा खडा काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील शेतात हरवला होता. ज्वारीच्या काढणीचे काम सुरू असताना हा खडा पडला असावा, असा अंदाज होता. कुटुंबीयांनी शेतात बराच शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर तो कायमचा हरवला, अशी समजूत करून कुटुंबाने आशा सोडून दिली होती.
advertisement
मशीनमधून पोत्यात आणि पोत्यातून हातात!
हा हिरा ज्वारीच्या कणसांसोबत काढणीच्या मशीनमध्ये गेला. आश्चर्याची बाब म्हणजे, मशीनमध्ये ज्वारी भरडली जात असतानाही या हिऱ्याला साधी चराही गेली नाही. तो हिरा ज्वारीच्या दाण्यांसोबत पोत्यात भरला गेला. हे ज्वारीचे पोते बारामतीहून तळेगाव दाभाडे येथील शहा यांच्या घरी पोहोचले.
आईने निवडली ज्वारी अन् सापडला हिरा!
नितीन शहा यांची आई जेव्हा घरच्या वापरासाठी ज्वारी निवडायला बसली, तेव्हा त्यांना धान्यामध्ये काहीतरी चमकताना दिसले. बारकाईने पाहिल्यावर तो चक्क हरवलेला 'डायमंड' असल्याचे लक्षात आले. तो खडा पाहताच कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. "हा खडा परत मिळेल, अशी आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. तो मशीनमधून सुरक्षित राहून पोत्यातून पुन्हा घरी येणे, हा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही," अशी भावना शहा कुटुंबाने व्यक्त केली आहे.
