नेमकी घटना काय?
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सतीश रोकडे हे पत्नी पल्लवी आणि मुलांसह चारचाकीने आळंदी दर्शनासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान आळंदी फाटा येथे मुलांसाठी नाश्ता करण्यासाठी ते थांबले. यावेळी गाडीतून उतरताना पल्लवी रोकडे यांच्या मांडीवर असलेली बॅग नकळत रस्त्यावर पडली. बॅग पडल्याचे लक्षात न आल्याने रोकडे कुटुंब पुढे दर्शनासाठी निघून गेले.
advertisement
रस्त्यावर पडलेली ही बॅग एका सुजाण नागरिकाला सापडली, त्याने ती तात्काळ तिथे ड्युटीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक नामदेव गाडे यांच्याकडे सुपूर्द केली. पोलिसांनी बॅगेची तपासणी केली असता, त्यात दोन तोळे सोन्याची पोत, नथ, बाळी, चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज आढळला. बॅगेत असलेल्या एका व्हिजिटिंग कार्डच्या आधारे पोलिसांनी सतीश रोकडे यांच्याशी संपर्क साधला.
संपर्क होताच रोकडे दाम्पत्य आळंदीहून परतले आणि स्पायसर चौक येथील वाहतूक पोलीस चौकीत हजर झाले. पोलीस निरीक्षक नीलेश वाघमारे यांच्या उपस्थितीत योग्य खातरजमा करून हा सर्व ऐवज त्यांना सुखरूप परत करण्यात आला. पोलिसांनी दाखवलेल्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
