पुण्यातील वडगाव शेरी भागात 1892 साली सुलतान आगाखान यांनी ‘आगाखान पॅलेस’ची निर्मिती केली. दुष्काळाच्या काळात स्थानिक लोकांना रोजगार मिळावा आणि गरिबांना आधार मिळावा म्हणून ही भव्यदिव्य इमारत उभारण्यात आली होती.
1942 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढा दरम्यान ‘भारत छोडो’ चळवळ सुरू झाली आणि या चळवळी वेळी महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी यांचे सचिव आणि निकटवर्तीय महादेवभाई देसाई यांना 9 ऑगस्ट 1942 ते 6 मे 1944 पर्यंत आगाखान पॅलेस येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पुढे 1942 मध्ये कैद केल्यानंतर काही दिवसातच गांधीजींचे निकटवर्तीय महादेवभाई देसाई यांचे निधन झाले. त्यानंतर 1944 साली महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचं देखील याच आगाखान पॅलेस मध्ये निधन झालं.
advertisement
‘आगाखान पॅलेस’मध्ये आजही महात्मा गांधी यांच्या अनेक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये भांडी, कपडे इत्यादी दैनंदिन आयुष्यातील गोष्टी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच इतर वस्तू, छायाचित्र, पत्रव्यवहार आणि ऐतिहासिक दस्तऐवज जतन करण्यात आलेले आहे. ‘आगाखान पॅलेस’ परिसरात महादेव भाई देसाई आणि कस्तुरबा गांधी यांच्या समाधी मुळा नदीच्या काठी आहेत.
दरम्यान, ‘आगाखान पॅलेस’ केवळ ऐतिहासिक वास्तू नसून महात्मा गांधी यांच्या स्मृतींचे केंद्रस्थान आहे. देशभरासह विदेशातून देखील पर्यटक, संशोधक आगाखान पॅलेसला आवर्जून भेट देतात. दरवर्षी 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.