काय आहे नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेते. पुण्यातीलच डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजचा एक विद्यार्थी गेल्या १५ दिवसांपासून या तरुणीला ऑनलाईन माध्यमातून सातत्याने त्रास देत होता. तिचा पाठलाग करत होता. वारंवार होणाऱ्या या मानसिक छळामुळे तरुणी अत्यंत त्रस्त झाली होती. अखेर तिने धिर एकवटून ही बाब आपल्या वडिलांना सांगितली.
advertisement
वडिलांनी कॅम्पसमध्ये घुसून शिकवला धडा
मुलीसोबत घडणारा प्रकार ऐकून वडिलांना संताप अनावर झाला. त्यांनी आरोपी मुलाला धडा शिकवायचं ठरवलं. ते आपल्या मुलीसोबत कॉलेजला आले. यावेळी संबंधित हुल्लडबाज विद्यार्थी पुन्हा या कॉलेज परिसरात आला. मुलीची छेड काढताना वडिलांनी त्याला रंगेहाथ पकडलं. सुरुवातीला वडिलांनी त्याला समजावण्याचा आणि जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या विद्यार्थ्याने उद्दामपणा केल्याने पित्याचा संयम सुटला. संतापलेल्या वडिलांनी त्या हुल्लडबाजाला कॅम्पसमध्येच लोळवले आणि चांगलाच चोप दिला.
कॅम्पसमध्ये मोठा राडा
हा प्रकार सुरू असताना दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाली. कॉलेजच्या आवारातच हा प्रकार घडल्याने इतर विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांची मोठी गर्दी जमली होती. या सर्व गर्दीसमोरच तरुणीच्या वडिलांनी तरुणाच्या अंगावर बसून त्याला चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अशा प्रकारे बाहेरील विद्यार्थी येऊन तरुणींना त्रास देत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
