या मॉकड्रिलमध्ये लष्कर, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, केंद्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दल महापालिका, नगरपालिका, आणि इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्त सहभाग नोंदवला. त्याचबरोबर एनसीसी, एनएसएस, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नेहरू युवा केंद्राच्या समन्वयकांनीही सक्रिय भूमिका बजावली.
advertisement
प्रात्यक्षिकादरम्यान बॉम्बस्फोट, रासायनिक हल्ले, नागरिकांचे स्थलांतर, जखमींना मदत आणि अडकलेल्यांची सुटका यासारख्या विविध संकट परिस्थितींचा अभ्यास करण्यात आला. घटनास्थळी श्वान पथकाद्वारे स्फोटकांची तपासणी करण्यात आली आणि वैद्यकीय पथकांमार्फत जखमींवर त्वरित उपचार करण्यात आले.
पुणे विधानभवन, मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगरपरिषद, वनाज औद्योगिक वसाहत तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दुपारी चार वाजता ही कवायत एकाच वेळी राबवण्यात आली. सर्व यंत्रणांनी शिस्तबद्ध आणि काटेकोर पद्धतीने आपली भूमिका पार पाडली. काही महत्त्वाच्या प्रात्यक्षिकांची अंमलबजावणी विधानभवन परिसरात करण्यात आली.
प्रशासनाकडून याबाबत स्पष्ट करण्यात आलं की, ही प्रात्यक्षिक केवळ चाचणी असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. या उपक्रमामागचा मुख्य हेतू म्हणजे युद्धजन्य किंवा अन्य आपत्तीजनक परिस्थितीत वेळीच मदत पोहोचवता यावी आणि जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करता याव्यात, यासाठीची तयारी तपासणं हा आहे.
मॉकड्रिलला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आणि अशा प्रकारचे उपक्रम भविष्यात आणखी परिणामकारक ठरतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी व्यक्त केला.





