कसा घडला अपघात?
पहाटेच्या वेळी हा कंटेनर (क्रमांक AP/16/TF/3379) मुंबईच्या दिशेने जात होता. याचवेळी अमृतांजन पॉईंटच्या अवघड वळणावर कंटेनरचा 'ब्रेक फेल' झाला आणि चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे भरधाव कंटेनर रस्त्यावरच पलटी झाला. सुदैवाने, या भीषण अपघातात जीवितहानी टळली असली तरी कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
अपघातामुळे मुंबईकडे जाणारी तिन्ही लेनची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेत मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक जुन्या महामार्गावरून वळवली.
कंटेनरचा अपघात इतका भीषण होता की त्याचे चेसिस तुटले होते. IRB च्या दोन हायड्रा आणि एका क्रेनच्या साहाय्याने बराच वेळ अथक परिश्रमानंतर पलटी झालेला कंटेनर उभा करून बाजूला हलवण्यात आला. सध्या एक्सप्रेसवेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली असून प्रशासनाने चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यात विचित्र अपघात
पुण्यातून अपघाताची आणखी एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. यात बाणेर परिसरात एका स्कूल बस चालकाच्या बेदरकारपणामुळे निष्पाप डिलिव्हरी बॉयचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात झालेल्या एका विचित्र अपघातात ट्रॅक्टरची ट्रॉली उडून दुचाकीवर पडल्याने डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. शिवाजी उत्तमराव शिंदे (वय ५३, रा. बाणेर) हे ११ मार्च रोजी दुपारी आपल्या दुचाकीवरून डिलिव्हरी देण्यासाठी जात होते. बाणेरमधील ननावरे पूल ते राधा चौक दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर 'ध्रुव इंटरनॅशनल' स्कूलची बस भरधाव वेगाने येत होती. बस चालक विकास गोंगेने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ट्रॅक्टरची ट्रॉली वेगाने फिरली आणि चक्क उंच उडून मागे असलेल्या शिवाजी शिंदे यांच्या दुचाकीवर कोसळली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे शिवाजी शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
