मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे बांधकाम डिसेंबर अखेर पूर्ण होईल. मात्र, त्यानंतर या मार्गिकेच्या चाचण्या, तपासणी करण्यात येणार आहे. त्या यशस्वी झाल्यानंतरच ही मार्गिका सेवेत दाखल होणार आहे. यासाठी बांधकाम पूर्ण झाल्यावर तीन महिन्यांचा कालावधी लागेल. आता एमएसआरडीसीने मार्च 2026 ची नवी डेडलाईन सांगितली आहे.
advertisement
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अपुरा
मुंबई-पुणे या शहरांतील अंतर जलद पार करता यावे यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली. 94.5 किमीच्या या द्रुतगती महामार्गामुळे हे अंतर केवळ अडीच तासांत पार करता येऊ लागले. या महामार्गावरून मोठ्या संख्येने वाहने धावत असून राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि महत्त्वाचा महामार्ग म्हणून याकडे पाहिले जाते. मात्र, हा महामार्ग देखील सध्या अपुरा पडत असून अपघाताची भीती वाढली आहे.
30 मिनिटांची बचत
पुढील काळात देशात वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने या महामार्गाच्या आठपदरीकरणासह खोपोली-कुसगाव दरम्यान 19.80 किमी लांबीची नवीन मार्गिका म्हणजेच मिसिंग लिंक बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फेब्रुवारी 2019 मध्ये या मिसिंग लिंकच्या बांधकामास सुरुवात झाली. या प्रकल्पामुळे खोपोली-कुसगाव मार्ग सहापदरीवरून आता आठपदरी होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवासाच्या वेळेत 30 मिनिटांची बचत होणार आहे.
मार्च 2026 चा मुहूर्त
मुंबई-पुणे मार्गावरील मिसिंग लिंकचे बांधकाम डिसेंबर अखेरीस पूर्ण होईल. मात्र, या मार्गिकेच्या काही तपासणी आणि चाचण्या कराव्या लागणार आहेत. ही मार्गिका डोंगर-दऱ्यांतून जात असल्याने आवश्यक चाचण्या आणि तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे हा मार्ग मार्च 2026 अखेर वाहतुकीस सुरू होईल, अशी माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिलीये.