हा बदल कोणत्या तारखेपासून लागू होईल?
नांदेड–पुणे एक्स्प्रेस पुण्याच्या मुख्य स्थानकापर्यंत न नेता ती हडपसरपर्यंतच चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. हा बदल 26 जानेवारीपासून अमलात येणार असून ऑनलाइन आरक्षण व्यवस्थेतही त्यानुसार सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना नव्या वर्षात हडपसरपर्यंत उतरून पुढे पुणे शहर गाठण्याची अतिरिक्त कसरत करावी लागणार आहे. हा निर्णय नोव्हेंबरमध्ये जाहीर झाला होता; मात्र महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याची तीव्र नाराजी प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
advertisement
नांदेड-पुणे एक्स्प्रेस हडपसर येथे पहाटे सुमारे 4.30 वाजता पोहोचणार आहे. या वेळेत त्या परिसरात पुणे महानगरपालिकेची बस सेवा उपलब्ध नाही. शिवाय खासगी वाहने मनमानी दर आकारतात. पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर, स्वारगेट, महापालिका परिसर तसेच खराडी यांसारख्या भागांपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.
या बदलाचा फटका वृद्ध, महिला, विद्यार्थी तसेच दररोज पुण्यात नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या मराठवाड्यातील शेकडो प्रवाशांना बसणार असल्याचे मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अरुण मेघराज आणि दयानंद दीक्षित यांनी सांगितले.
या बदलामुळे छत्रपती संभाजीनगरसह जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव येथील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे विविध प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून, हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.
