श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात वाहतुकीवर बंदी
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवार पेठेतील श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांनी वाहतुकीचे विशेष नियोजन केले आहे. आजपासून अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतचा (हुतात्मा चौक) रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. या मार्गावर एकेरी वाहतूकच सुरू राहणार आहे. तसेच लक्ष्मी रस्त्यावर गणपती चौक ते श्री तांबडी जोगेश्वरी दरम्यानचा रस्ता देखील तात्पुरते वाहतुकीस बंद राहणार आहे.
advertisement
शनिवारवाडा आणि शनिवार पेठेतील बदल
शनिवारवाड्यापासून श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांसाठी बंद राहणार आहे. मंदिर परिसरात वाहन थांबवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरातही वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतुःश्रृंगी मंदिर परिसरात गर्दी झाल्यास वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाईल. या भागात गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरून वाहतूक वेताळबाबा चौकमार्गे दीप बंगला चौक आणि ओम सुपर मार्केटमार्गे वळवण्यात येईल. भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरातही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
श्रीसूक्त पठणानिमित्त वाहतुकीत बदल
सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात उद्या सकाळी 5 ते 7 या वेळेत श्रीसूक्त पठण पार पडणार असल्याने परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. स्वारगेटकडून सारसबागमार्गे स्वा. सावरकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. तसेच मित्रमंडळ चौकाकडून पूरम चौकाकडे जाणारा मार्गही बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी नागरिकांना सूचित केले की, मित्रमंडळ चौकातून येणारी वाहने सावरकर चौकातून सिंहगड रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जावीत. तसेच सिंहगड रस्त्याद्वारे सावरकर चौकात येणारी वाहने लक्ष्मीनारायण चौक मार्गे इच्छित स्थळी वळवावी.