भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक हा बीआरटी मार्ग निगडी, आकुर्डी, प्राधिकरण, ढाका, थेरगाव यांसारख्या महत्त्वाच्या भागांना जोडणारा आहे. या परिसरात आयटी पार्क, औद्योगिक वसाहती, शैक्षणिक संस्था आणि बाजारपेठा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची वर्दळ प्रचंड असते. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी रस्त्यांवर तुफान कोंडी निर्माण होते. या गर्दीतून मार्ग काढताना अपघाताचा धोका वाढतो आणि वेळेचा मोठा अपव्यय होतो.
advertisement
स्थानिक नागरिक संघटना आणि व्यापारी मंडळ यांनी या संदर्भात महापालिका प्रशासनाला निवेदन देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांची प्रमुख मागणी म्हणजे हा मार्ग तातडीने सुरू करून प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून द्यावी. तसेच आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा स्थानिक राजकारणात अधिक गाजण्याची शक्यता आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, पालिका प्रशासनाने याप्रकरणी ठोस भूमिका घेऊन मुदतीसह बीआरटी सेवा सुरू करण्याची घोषणा करावी. मात्र, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही.
नागरिकांच्या मते, बीआरटी मार्ग सुरू झाल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल. सध्या बहुसंख्य प्रवासी दुचाकी किंवा चारचाकीचा वापर करून दैनंदिन प्रवास करतात. त्यामुळे रस्त्यांवरील गर्दी वाढते आणि इंधनाचा खर्चही जास्त होतो. बीआरटी सेवा सुरू झाल्यास नागरिक बससेवा वापरून वेळ आणि पैसा वाचवू शकतील. व्यापारी, शाळा-कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, नोकरी करणारे कर्मचारी यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल.
याशिवाय, बीआरटी बसमार्गामुळे पर्यावरणालाही दिलासा मिळणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर कमी झाल्याने बायुप्रदूषणावर नियंत्रण येईल. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी ही पायरी महत्त्वाची ठरू शकते.
नागरिकांनी स्पष्ट केले आहे की, बीआरटी मार्ग सुरू करणे ही केवळ वाहतूक सोयीची बाब नाही, तर पर्यावरण संरक्षण, अपघातांची संख्या कमी करणे, वेळ आणि खर्चाची बचत यासारख्या अनेक दृष्टींनी फायदेशीर आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक बीआरटी मार्ग सुरू होणार की नाही, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. महापालिकेकडून मार्गाच्या प्रगतीची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.