वेगाने शहरीकरण होत असलेल्या पुण्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठं शहर बनण्याचा मान मिळालेला असला, तरी पायाभूत सुविधांमध्ये मात्र पुणे अजूनही मागे आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत अलीकडेच 23 नव्या गावांचा समावेश झाल्याने शहराचं एकूण क्षेत्रफळ आता 519 चौरस किलोमीटरवर पोहोचलं आहे. त्यामुळे पुण्याने मुंबईलाही 440 चौ. किमी क्षेत्रफळाच्या बाबतीत मागे टाकलं आहे.
advertisement
सध्या शहरात 2044 किलोमीटर इतकं रस्त्यांचं जाळं आहे. यामध्ये जुन्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील 1400 किमी आणि समाविष्ट 34 गावांतील रस्त्यांचा समावेश आहे. मात्र एवढ्या मोठ्या शहराला ही लांबी पुरेशी नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शहराच्या विकास आराखड्यानुसार, जुन्या महापालिका हद्दीत एकूण 1384 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यापैकी केवळ 425 किलोमीटर रस्त्यांचेच रुंदीकरण पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप सुमारे 500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण प्रलंबित आहे. या कामात मोठा अडथळा म्हणजे भूसंपादन प्रक्रिया. सध्या 459 रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी लागणारा कालावधी खूप मोठा असल्यामुळे ही कामे रखडत आहेत.
पुणे शहराच्या क्षेत्रफळाचा विचार केला असता, शहरात फक्त 8 टक्के रस्तेच उपलब्ध आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
शहराच्या एकूण क्षेत्रफळानुसार किमान 15 टक्के जागेवर रस्ते असणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या केवळ 8 टक्के रस्त्यांचेच जाळे विस्तारले आहे. पथ विभागामार्फत अपूर्ण रस्त्यांची कामे सुरू आहेत. तर जे रस्ते महत्त्वाचे आहेत, त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून निधीची मागणी करण्यात आली आहे. हे रस्ते पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने काम सुरू आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे रस्ते विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.