पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव इथं ४० एकर जागा फक्त ३०० कोटींना खरेदी केली होती. या जमिनीचा व्यवहार हा ३०० कोटींमध्ये झाला होता. पण, या डिलची कागदपत्र बाहेर आली आणि घोटाळा समोर आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अखेरीस २४ तासांच्या आत हा व्यवहार रद्द करण्यात आला अशी माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यावी लागली. पण, हा व्यवहार रद्द झाला असला तरी पार्थ पवारांना मोठा दंड भरावा लागणार आहे.
advertisement
पार्थ पवार यांनी हा व्यवहार रद्द करण्यासाठी स्वत: बावधन परिसरातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात आपल्या लिगल टीमसह हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज सादर केला होता. पण, व्यवहाराची नोंदणी झाली होती. त्यामुळे ठरलेल्या किंमतीनुसार मुद्रांक शुल्क भरण्यास सांगून अर्ज रद्द केला आहे. पार्थ पवार यांना सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाकडून त्रुटी अर्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता पार्थ पवारांना आता या व्यवहारासाठी कमीत कमी ४२ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे.
आता दस्त रद्द करायचा असेल तर ४२ कोटी भरावे असं पत्रच महसूल विभागाकडून पार्थ पवार यांच्या अमेडिया एलएलपी कंपनीला देण्यात आलं आहे. आधीचं मुद्रांक शुल्क २१ कोटी आणि दस्त रद्द करण्यासाठी २१ कोटी असे म्हणून ४२ कोटी रुपये भरावे लागणार आहे. पूर्ण मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारता येणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
