पुण्यातील नवले पूल हा अपघातात डेड स्पॉट बनला आहे. गुरुवारी १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास एका भरधाव कंटेनरचं ब्रेक फेल झालं. त्यानंतर या कंटेनरने समोर येईल त्या वाहनांना धडक दिली. तब्बल २ किमी हा थरार सुरू होता. या कंटेनरने जवळपास २० वाहनांना चिरडलं. त्यानंतर एका ट्रकला मागून धडक दिली होती.
advertisement
या ट्रकला धडक देताना दोन्ही वाहनामध्ये एक सीएनजी कार सापडली. कंटेनर आणि ट्रकमध्ये कारचा चेंदामेंदा झाला. कारमधील ५ जणांचा होरपळून कोळसा झाला. या अपघातानंतर काही लोक मदतीसाठी धावून आले, जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पण काही जण असेही होते ते आपला स्वार्थ साधण्यासाठी तिथे आले होते. इंस्टाग्रामवर एक रिल व्हायरल झाली आहे. या व्हिडिओनुसार, अपघातस्थळावर ज्या गाड्यांचा अपघात झाला त्या गाड्यांमधून साहित्य रस्त्यावर पडलं होतं. तेव्हा काही लोक हे रस्त्यावर पडलेले पैसे, सोन्याचे दागिने गोळा करत होते, असा दावा या तरुणाने रिलमध्ये केला आहे. अत्यंत संतापजनक हे दृश्य होतं.
ज्या नवले पुलावर ८ जणांनी आपला जीव गमावला, २० जण जखमी झाले, अशा ठिकाणी लोक पैसे आणि दागिने गोळा करत होते, हे दृश्य पाहून माणुसकी मेली आहे का? मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही माणसं कोण होती, असा संतप्त सवाल उपस्थितीत केला जात आहे.
रस्त्यावरील खिळे गोळा करत होते?
दरम्यान, आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. भरधाव कंटेनरने २० वाहनांना चिरडलं होतं. तब्बल २ किमी रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनं अपघातग्रस्त अवस्थेत होती. पुणे वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून हटवली होती. पण, रस्त्यावर ठिकठिकाणी धडक झाल्यामुळे वाहनांचे तुकडे, खिळे आणि इतर साहित्य पडलेलं होतं.
जर वाहतूक सुरू झाली असती तर अनेक वाहनं एक तर पंक्चर झाली असती किंवा अपघात झाला असता. त्यामुळे तब्बल ४ ते ५ तास वाहतूक थांबवण्यात आली होती. अपघातग्रस्त वाहनं बाजूला केली होती आणि पुणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर साफसफाई केली, त्यानंतर महामार्ग सुरू केला होता. त्यावेळी स्थानिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना रस्ता साफ करण्यासाठी मदत केली असावी, असंही सांगितलं जात आहे.
