ओरिसा कनेक्शन उघड: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तस्करीचे धागेदोरे थेट ओरिसा राज्याशी जुळले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हा अमली पदार्थांचा साठा ओरिसा येथून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आकुर्डी येथील महामार्गावर संशयित वाहनांची तपासणी केली. यावेळी दोन कारमध्ये गांजाची पोती, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मोबाईल संच आढळून आले.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी नूरमोहमद शिराजउद्दीन शेख (वय २९, रा. चिखली), मोहियोद्दीन लियाकत कुरेशी (वय ३०, रा. चिंचवड), आयेशा नूरमोहमद शेख आणि आणखी एका संशयित महिलेला अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या कुमार, विशाल आणि रुपेश मुळूक यांच्या विरोधातही निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अमली पदार्थ विरोधी पथकाने ४२ लाखांचा गांजा, कार आणि इतर साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात अमली पदार्थांचे जाळे पसरवणाऱ्या मोठ्या टोळीचा हा भाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे.
