अशी झाली फसवणूक: फिर्यादी अशोक कृष्णा सराफ यांना चोरट्यांनी फोन करून आपण 'सीबीआय' (CBI) अधिकारी बोलत असल्याचे भासवले. तुमच्या नावावर असलेले बँक खाते ईडीने (ED) कारवाई केलेल्या एका गंभीर गुन्हेगाराशी संबंधित असल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले. तुमचे खाते मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात अडकले असून, अटक टाळायची असेल तर सहकार्य करा, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले.
advertisement
गुंतवणूक आणि खात्यांमधील रक्कम लंपास: संशयितांनी 'लिगॅलिटी चेक' करण्याच्या नावाखाली सराफ यांना त्यांच्या बँक खात्यातील सर्व रक्कम आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडले. ही सर्व प्रक्रिया कायदेशीर असून चौकशी पूर्ण झाल्यावर तुमचे पैसे पुन्हा मिळतील, असे खोटे आश्वासन त्यांना देण्यात आले. या भीतीपोटी फिर्यादी सराफ यांनी एकूण १ कोटी रुपये चोरट्यांच्या खात्यात पाठवले.
पैसे पाठवल्यानंतर बराच काळ उलटला तरी परतावा मिळाला नाही आणि चोरट्यांचे फोन बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे सराफ यांच्या लक्षात आले. त्यांनी सोमवारी (१९ जानेवारी) पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
