नेमकी घटना काय?
बाळासाहेब कुंजीर स्टेडियम येथील 'आनंद हास्य क्लब'च्या सदस्यांना लक्ष्य करून ही फसवणूक करण्यात आली. राजेंद्रनाथ हजारीराम जस्ताल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 'भक्ती दर्शन टूर्स'चा संचालक योगेश प्रभाकर देशमुख याने क्लबमधील ५२ सदस्यांकडून प्रत्येकी ४५ हजार रुपये जमा केले होते. नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झालेला हा फसवणुकीचा सिलसिला २५ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होता.
advertisement
एकूण ५४ लोकांपैकी २८ जणांना आरोपी यात्रेला घेऊन गेला होता. मात्र तिथेही त्याने खोटी आश्वासने दिली. हेलिकॉप्टर सफारीसाठी १६ लोकांकडून प्रत्येकी १५ हजार रुपये जास्तीचे घेऊनही त्यांना कोणतीही सेवा पुरवली नाही. उर्वरित २६ पैकी केवळ ५ जणांचे पैसे परत करण्यात आले. मात्र, २१ जणांचे मूळ ९ लाख ४५ हजार रुपये आणि १६ जणांच्या हेलिकॉप्टर सुविधेचे २ लाख ४० हजार रुपये, असा एकूण ११ लाख ८५ हजार रुपयांचा अपहार करून आरोपीने पोबारा केला.
पैसे परत न मिळाल्याने अखेर ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांत धाव घेतली. सांगवी पोलिसांनी योगेश देशमुख विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
