किसन बापू सुर्वे (वय ७५, रा. भोंगवली) असे मृताचे नाव असून, राजगड पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक केली आहे. मिळालेली माहिती अशी की, नसरापूर-वेल्हे मार्गावरील जांभळी येथील एका हॉटेलमध्ये सागर थापा (वय २१) हा तरुण काम करत होता. त्याने हॉटेल मालक अनिल रसाळ यांच्याकडे नवीन मोबाईल घेऊन देण्याची मागणी केली होती. मात्र, मालकाने मोबाईल देण्यास नकार दिल्याने सागर प्रचंड संतापला होता. बुधवारी (दि. २५) मध्यरात्री याच रागातून त्याने मालकाचे सासरे किसन सुर्वे यांच्यावर बोथट हत्याराने हल्ला केला, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
एका फोन कॉलने आरोपीला पकडलं
खून केल्यानंतर आरोपी सागर थापा याने रात्रीच रिक्षा पकडून पुणे गाठलं. मात्र, रिक्षाचालकाला देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मग त्याने चक्क हॉटेल मालकाच्याच मुलाला फोन करून ऑनलाईन ५०० रुपये पाठवण्याची मागणी केली. मालकाच्या मुलाने तात्काळ प्रसंगावधान राखले आणि रिक्षाचालकाला फोन करून आरोपीला तिथेच थांबवून ठेवण्यास सांगितले. काही वेळातच राजगड पोलिसांनी पुण्यात पोहोचून आरोपीला बेड्या ठोकल्या.
वृद्धाच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हॉटेलमध्ये कामगारांची नेमणूक करताना त्यांची पूर्ण माहिती घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
