या वर्षी पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली असून, कसबा, मंडई आणि स्वारगेट या स्थानके थेट मानाच्या गणपती मंडळांजवळ पोहोचतात. त्यामुळे भाविकांना गर्दी टाळून आरामदायक प्रवास करता आला. गणेशोत्सव काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने विशेष नियोजन केले आहे. जिल्हा न्यायालय-स्वारगेट दरम्यान गर्दीच्या काळात मेट्रो दर तीन मिनिटांनी धावणार आहे. 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान सेवा सकाळी सहा वाजेपासून पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, तर 6 व 7 सप्टेंबर रोजी सलग 41 तास अखंड सेवा उपलब्ध राहणार आहे.
advertisement
साधारणपणे, मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर दररोज दोन लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, शनिवारी एकाच दिवशी सव्वा दोन लाखाहून अधिक प्रवाशांनी मेट्रो वापरल्यामुळे सर्व प्रवासी संख्येचे मागील विक्रम मोडीत निघाले आहेत, अशी माहिती मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली.
गर्दी टाळण्यासाठी सूचना
मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कसबा पेठ स्थानकावर उतरावे आणि परतीचा प्रवास मंडई स्थानकावरून करावा. वनाझ-रामवाडी मार्गावरील प्रवाशांनी पुणे महापालिका स्थानकावर उतरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रस्ते बंद; मेट्रोकडे अधिक प्रवाशांची शक्यता
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मध्यवस्तीतील मंडई मेट्रो स्थानकावर प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली. रविवारपासून पोलिसांनी मध्यवस्तीतील काही रस्ते वाहतुकीसाठी अंशतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने मेट्रोवर प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मेट्रो सेवेकडे भाविकांचा हा उत्साह सणाच्या काळात प्रवासाच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी सकारात्मक आहे, तसेच गर्दी नियोजनासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांचीही दखल घेण्यासारखी घटना आहे.