डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन हल्ला
बाणेर येथील एका खासगी प्रशिक्षण संस्थेच्या आवारात २९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास गोळीबाराच्या प्रयत्नाची घटना घडली होती. इथं २४ वर्षीय पीडित तरुणी 'एमबीए'चे शिक्षण घेत असून, ती येथे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेत होती. दोन वर्षांपूर्वी तिची एका मित्राच्या माध्यमातून आरोपी गौरव नायडू याच्याशी ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर नंतर प्रेमसंबंधात झाले. मात्र, गौरववर २०२१ मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा (वाकड पोलिस ठाणे) दाखल असून, तो येरवडा कारागृहात असल्याची माहिती तरुणीला मिळाल्यावर तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं आणि संबंध तोडले.
advertisement
या नकारामुळे संतापलेल्या गौरवने डिलिव्हरी बॉयच्या वेशात संस्थेच्या आवारात प्रवेश केला आणि तरुणीवर पिस्तुलातून सलग तीन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, त्याचे पिस्तूल लॉक झाले आणि गोळी न सुटल्याने तरुणीचा जीव वाचला. तरुणीने आरडाओरडा केल्यावर गौरव दुचाकीवरून पसार झाला.
देशी बनावटीचे पिस्तूल जप्त
ही घटना उघडकीस येताच बाणेर पोलिसांनी तत्परता दाखवत गौरव नायडूला खडकी रेल्वे स्थानकाजवळ पकडले. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली.
या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गौरवने जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्याला सरकारी वकील जावेद खान आणि तक्रारदार तरुणीचे वकील अॅड. खंडेराव टाचले यांनी जोरदार विरोध केला. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि त्याने हा हल्ला नियोजनबद्ध पद्धतीने केला होता. त्याला जामीन मिळाल्यास तो तरुणीवर पुन्हा हल्ला करण्याची आणि साक्षीपुराव्यांमध्ये छेडछाड करण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद वकिलांनी केला. हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या निर्णयामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास मदत होणार आहे.
