बाकड्यावर 19 वर्षांची युवती रडत बसली
कोल्हापुरात 30 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास पाटील गल्लीतील एका बाकड्यावर 19 वर्षांची युवती रडत बसलेली दिसली. ही बाब टिपू मुजावर यांच्या लक्षात येताच त्यांनी ओंकार पाटील यांना माहिती दिली. दोघांनी मिळून पोलिसात धाव घेतली अन् तरुणीची माहिती दिली. पोलिसांनी देखील तातडीने तरुणीच्या दिशेने धाव घेतली अन् नेमकं काय झालं? याची माहिती घेण्यास सुरूवात केली.
advertisement
ना स्वतःचा मोबाईल होता, ना प्रवासासाठी पैसे...
पुण्यातील एक 22 वर्षीय तरुणी सोशल मीडियावरील एका मित्राच्या आमिषाला बळी पडून 4 दिवसांपूर्वी घर सोडून कोल्हापुरात दाखल झाली होती. संबंधित तरुणाने तिला कसबा बावडा परिसरात भेटायला बोलावले होते, मात्र प्रत्यक्षात तो तिथे आलाच नाही. त्या तरुणीकडे ना स्वतःचा मोबाईल होता, ना प्रवासासाठी पैसे... तो मित्र तिला तीन दिवस शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरवत राहिला आणि अखेर मंगळवारी त्याने दिलेला पत्ताही खोटा निघाला. तासनतास वाट पाहूनही तो तरुण न आल्याने पूर्णतः फसली गेल्याची जाणीव होताच ती तरुणी रस्त्यावर हताश होऊन रडू लागली.
आईशी संपर्क साधला अन्...
भररस्त्यात एक तरुणी रडत असल्याचे पाहून परिसरातील काही सुजाण तरुणांनी तिची विचारपूस केली. सुरुवातीला ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती, मात्र तरुणांनी विश्वास दिल्यानंतर तिने सर्व हकीकत सांगितली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिच्या आईशी संपर्क साधला असता, पुण्यात आधीच ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आल्याचे समजले. आपली मुलगी कोल्हापुरात सुरक्षित असल्याचे ऐकताच आईला रडू कोसळलं. त्यांनी स्थानिक तरुणांना आपली मुलगी ताब्यात घेईपर्यंत सुरक्षित ठेवण्याची कळकळीची विनंती केली.
