नेमकी घटना काय?
फिर्यादी सचिन रणपिसे हे औंध स्मशानभूमीमध्ये ऑपरेटर म्हणून काम करतात. त्यांचा मित्र रोहित आडुळकर याच्या चुलत्यांचे निधन झाले होते. मृत व्यक्तीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने, सचिन यांनी माणुसकीच्या नात्याने स्वतःकडील गोवऱ्या आणि लाकडे त्यांना मोफत दिली होती. मात्र, ही बाब पाषाण स्मशानभूमीचा लाकूड पुरवठादार अजय माकर याला प्रचंड खटकली.
advertisement
११ मार्चच्या रात्री साडेअकराच्या सुमारास, अजय माकर आणि त्याच्या साथीदारांनी सचिन यांना फोन करून विठ्ठल मंदिराजवळ बोलावले. तिथे पोहोचताच, "माझ्याकडून लाकडे का घेतली नाहीत आणि फुकट का दिली?" असे म्हणत माकर आणि त्याच्या साथीदारांनी सचिन यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर माकर याने रागाच्या भरात थेट सत्तूर काढून सचिन यांच्या खांद्यावर वार केले. एवढ्यावरच न थांबता, तिसऱ्या साथीदाराने सचिन यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना गंभीर जखमी केले. सचिन यांनी कसा तरी जीव वाचवून तिथून पळ काढला.
बाणेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अजय माकर, अतिश चव्हाण आणि रामु मुप्पाला या तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
