निलेश घायवळ टोळीचा 'नंबरकारी'
या प्रकरणात बटव्या चौधरी याच्यासह अजय सरोदे याला कोथरूड पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथून अटक केली. अजय सरोदे हा निलेश घायवळ टोळीचा 'नंबरकारी' म्हणून कार्यरत होता. आरोपी अजय सरोदे याच्या कसून चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेण्याचा निर्णय घेतला. या झडतीमध्ये पोलिसांना चक्क 400 काडतूस आढळले, ज्यामुळे पोलीसही चक्रावून गेले. यात 200 जिवंत काडतूस आणि अन्य 200 रिकाम्या पुंगळ्या पोलिसांना सापडल्या आहेत.
advertisement
जिल्हा परिषद निवडणूकीपुर्वी मोठा डाव?
पोलीस रेकॉर्डनुसार, अजय सरोदे हा 17 सप्टेंबर रोजी कोथरूड भागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत घटनास्थळी उपस्थित होता आणि तो त्या गुन्ह्यात आरोपी होता. या टोळीने एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. विशेष म्हणजे, इतका गंभीर गुन्हा दाखल असतानाही, अजय सरोदे याच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचे समोर आले आहे. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ हा जिल्हा परिषद निवडणूक लढणार होता. त्यासाठी ही काडतुसं आणण्यात आली होती का? असा प्रश्न विचारला जात होता.
29 जानेवारी 2024 रोजी परवाना दिला
दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे पुणे पोलिसांनी त्याला 29 जानेवारी 2024 रोजी हा परवाना दिला होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. एका सक्रिय गुन्हेगारी टोळीच्या सदस्याकडे परवाना कसा आला, यावर आता गंभीर चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुणे पोलीस कसून चौकशी करत आहेत.
