भरदिवसा चोऱ्यांचा धुमाकूळ: सर्वात धक्कादायक घटना नवी पेठ भागात घडली. तक्रारदार महिला रविवारी सकाळी १०:३० वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असताना, चोरट्यांनी संधी साधून दीड लाखांचे दागिने आणि रोकड चोरली. चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश करीत कपाटातून रोकड तसेच सोन्याचे दागिने, असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. रविवार पेठेतील बंदीवान मारुती मंदिराजवळही अशाच प्रकारे दुपारी घर फोडून १ लाख ३ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
advertisement
ज्येष्ठ नागरिक लक्ष्य: सहकारनगरमधील नातूबाग येथील इंद्रलोक सोसायटीत राहणाऱ्या एका ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घरी मोठी चोरी झाली. ते शनिवारी बाहेर गेले असताना चोरट्यांनी कुलूप उचकटून ४ लाख ४ हजार रुपयांचे दागिने आणि रोकड चोरली. दरम्यान, विमानतळ पोलिसांनी १ लाख ३३ हजारांच्या चोरीप्रकरणी व्यंकटेश वसंत करंडे (वय ३४) याला अटक केली आहे.
वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घराला कुलूप लावून अवघ्या काही तासांसाठी बाहेर पडणेही आता जिकिरीचे झाले आहे. पोलिसांनी या सर्व प्रकरणांत गुन्हे दाखल केले असून, शहरात गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
