'हुंडा कमी दिला' यावरून छळ
पिडीतेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपी घटनेनंतर पसार झाले असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे लग्न 2008 मध्ये विजय तुपे यांच्याशी झाले होते. मात्र, लग्नानंतर लगेचच सासरच्या मंडळींनी 'हुंडा कमी दिला' या क्षुल्लक कारणावरून तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला वारंवार शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली.
advertisement
हडपसरचा फ्लॅट विकायला लावला
या छळाची परिसीमा तेव्हा झाली, जेव्हा विवाहितेच्या वडिलांनी तिच्या नावावर घेतलेला हडपसर येथील फ्लॅट जबरदस्तीने विकायला लावला गेला. या फ्लॅटच्या विक्रीतून आलेले 7 लाख 67 हजार 883 रुपये पती आणि सासूच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यास विवाहितेला जबरदस्ती करण्यात आली, असा गंभीर आरोप तिने फिर्यादीत केला आहे.
विवाहितेला पाईपने मारहाण केली
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती विजय तुपे याच्याकडून तिला वारंवार मारहाण, शिवीगाळ आणि पैशांसाठी दबाव आणला जात होता. इतकेच नाही तर, पती मुलांसमोरही तिच्यासोबत अश्लील बोलणे, मारहाण करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे प्रकार वारंवार करत होता. या छळात दीर कौस्तुभ तुपे याचाही सहभाग होता. त्याने 2016 मध्ये विवाहितेला पाईपने मारहाण केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी विजय लक्ष्मण तुपे, अलका लक्ष्मण तुपे, लक्ष्मण बबन तुपे, कौस्तुभ लक्ष्मण तुपे आणि सागर पांगारे अशा पाच जणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी पसार झाले असून, विश्रामबाग पोलिस त्यांचा शोध घेत आहेत आणि पुढील तपास सुरू आहे.
