32 वर्षं लोकांच्या जीवाशी खेळणारा तोतया अखेर जेरबंद!
महापालिकेच्या आरोग्य विभागाने बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाई मोहीम राबवताना या खोट्या डॉक्टरचा पर्दाफाश केला. कासेवाडी भागात दवाखाना चालवणाऱ्या गुंडूबद्दल माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकला. पाहणीदरम्यान धक्कादायक गोष्ट उघड झाली ती म्हणजे गुंडूकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नव्हती तसेच नोंदणी नव्हती तरीही तो रुग्णांना औषधं देत होता, इंजेक्शन देत होता आणि उपचार करत होता.
advertisement
आरोग्य विभागाने तत्काळ तक्रार दाखल केली आणि मे महिन्यात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. मात्र गुंडू त्यानंतर फरार झाला होता. तीन दशकांपासून लोकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा तोतया डॉक्टर अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय दोन्हीकडे जात होता, पण न्यायालयांनी त्याचे सर्व अर्ज फेटाळले. तरीही तो लपून बसला होता. शेवटी खडक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जयसिंग दाढे आणि त्यांच्या पथकाने शोधमोहीम राबवून त्याला गाठले आणि बेड्या ठोकल्या.
न्यायालयासमोर सादर केल्यानंतर सरकारी वकिलांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली आणि न्यायालयाने ती मंजूर केली. दरम्यान, पोलिसांकडून त्याच्या दवाखान्याशी संबंधित कागदपत्रांची, औषधांच्या नोंदींची आणि बेकायदेशीर उपचारांच्या पुराव्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागानेही यापूर्वी वारजे, कात्रज, कोंढवा, हडपसर परिसरात कारवाई करून अनेक तोतया डॉक्टरांना अटक केली होती. आता भवानी पेठेतील हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.32 वर्षं लोकांच्या जीवाशी खेळ चालू होता आणि कुणालाही संशय आला नाही? असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
