यंदाच्या वर्षातील या आजाराचा हा पहिलाच बळी असल्याने संपूर्ण जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने गोळा करण्याचे आणि सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून खासगी पाणी शुद्धीकरण केंद्रांचीही तपासणी केली जाणार आहे. उपचारादरम्यान 50 वर्षीय मन्सूर सय्यद यांचा मृत्यू झाला असून पुण्यातील आरोग्य विभाग पुन्हा अलर्ट मोडवर आलंय.
advertisement
हातापायाला मुंग्या अन् चालताना त्रास, GBS आजाराची नेमकी लक्षणे काय? कशी घ्यावी काळजी? Video
मृत मन्सूर सय्यद यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. जीबीएसच्या लक्षणांबरोबरच इतर व्याधींची गुंतागुंत वाढल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला व उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे 46 वर्षीय कस्तुरी पटेल या महिला रुग्णाने वेळेत उपचार घेतल्यामुळे पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याची दिलासादायक माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जीबीएस हा मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार असून तो थेट संसर्गजन्य नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. मात्र दूषित पाणी किंवा अन्नातून होणार्या संसर्गामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर परिणाम करू शकते. त्यामुळे प्रशासनाने पाणी स्रोतांची तपासणी, सॅनिटरी सर्व्हेलन्स व घरोघरी आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नीरा परिसरात आणखी एका व्यक्तीला या आजाराची लक्षणे दिसून आली होती, मात्र वेळेत उपचार मिळाल्याने तो रुग्ण आता धोक्याबाहेर आहे. या घटनेनंतर गावात घबराट पसरू नये म्हणून आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत.
दरम्यान, दूषित पाण्याचा सोर्स शोधण्यासाठी विहिरी आणि सार्वजनिक नळ योजनांच्या पाण्याची चाचणी केली जात आहे, जेणेकरून संसर्गाचे मूळ शोधता येईल. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, हाता-पायांना मुंग्या येणे किंवा स्नायू शिथिल होणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
