स्पर्धेचा मार्ग आणि वेळ: स्पर्धेला सकाळी बंडगार्डन येथील लेडीज क्लब आणि ब्लू नाईल चौक येथून प्रारंभ होईल. हा मार्ग लष्कर, वानवडी, लुल्लानगर, कोंढवा, खडी मशीन चौक, येवलेवाडी आणि बोपदेव घाटमार्गे पुणे ग्रामीण हद्दीत जाईल. त्यानंतर सिंहगड घाट, डोणजे आणि किरकटवाडीमार्गे नांदेड सिटी येथील मुख्य प्रवेशद्वारावर या टप्प्याचा समारोप होईल. दुपारी १२ ते ४ या दरम्यान स्पर्धा मार्ग आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे.
advertisement
शाळांना सुट्टी आणि प्रशासकीय आदेश: स्पर्धेच्या मार्गावर पूलगेट, सोलापूर बाजार, गोळीबार मैदान आणि लुल्लानगर यांसारख्या वर्दळीच्या भागांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग: वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी स्पष्ट केले की, कोणताही रस्ता ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बंद राहणार नाही. तरीही नागरिकांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा:
लष्कर परिसर: डॉ. आंबेडकर पुतळा ते गोळीबार मैदान रस्ता बंद असून, वाहतूक कोयाजी रोड आणि भैरोबा नालामार्गे वळवण्यात आली आहे.
कोंढवा भाग: शीतल पेट्रोल पंप ते खडी मशीन चौक रस्ता बंद असल्याने गंगाधाम चौक आणि मंतरवाडी मार्गाचा वापर करावा.
सिंहगड रस्ता: खडकवासला ते किरकटवाडी आणि नांदेड सिटी गेट परिसर स्पर्धा संपेपर्यंत बंद राहील. नागरिकांनी वारजे ब्रिज किंवा एनडीए-शिवणे लिंक रोडचा पर्याय निवडावा.
नांदेड सिटी मेन गेटसमोरील मार्ग सायंकाळपर्यंत बंद राहणार असल्याने सिंहगड रस्ते परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करू नयेत आणि बॅरिकेड्सच्या पाठीमागे थांबूनच स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
