संसारात वादाची ठिणगी पडली
भेकराईनगरमधील गुरुदत्त कॉलनी येथे राहणाऱ्या प्रियांका आकाश दोडके (वय 27) या महिलेचा त्यांच्याच पतीने गळा दाबून खून केला. आरोपी पती आकाश विष्णू दोडके (वय 35) याने शुक्रवारी रात्री ही टोकाची कृती केली. आकाश हा व्यवसायाने ड्रायव्हर असून, त्यांचे लग्न 2018 मध्ये झालं होतं. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या संसारात वादाची ठिणगी पडली होती, ज्याचा शेवट अशा दुर्दैवी पद्धतीने झाला.
advertisement
घरात सतत भांडणे आणि मारहाणीचे प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाला काही वर्षे उलटूनही प्रियांका यांना मूल होत नसल्याने आकाश नेहमी त्यांच्याशी वाद घालत असे. यासोबतच तो प्रियांकाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. या कारणावरून घरात सतत भांडणे आणि मारहाणीचे प्रकार घडत होते. शुक्रवारी रात्री देखील याच कारणावरून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. संतापलेल्या आकाशने रागाच्या भरात प्रियांकाचा गळा आवळून त्यांची हत्या केली.
प्रियांकाचा गळा आवळून हत्या
मागील तीन वर्षापासून प्रियांका आकाश सोबत न राहता भावाकडे राहत होती. आठ दिवसांपूर्वीच आकाशने प्रियांकाला फोन करून नांदण्यासाठी ये म्हणून फोन केला होता. त्यामुळे ती त्याच्याकडे पुण्यात राहण्यास आली होती. आकाशने 26 डिसेंबरला रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास प्रियांकाचा भेकराईनगर फुरसुंगी येथील राहत्या घरी हाताने आणि रस्सीने गळा आवळून खून केला.
पोलीस स्टेशन गाठले आणि गुन्ह्याची कबुली
हत्येनंतर आरोपी आकाशने पळून न जाता थेट फुरसुंगी पोलीस (Police) स्टेशन गाठले आणि गुन्ह्याची कबुली दिली. प्रियांका यांचा भाऊ सागर रामदास अडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकाशविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत असून, चारित्र्याच्या संशयाने एका निष्पाप महिलेचा बळी घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.
