नेमकी घटना काय?
रिक्षा चालक इब्राहिम उर्फ अज्जू अहमद शेख (वय ४८) हे ८ मार्चच्या मध्यरात्री कोंढव्यातील काकडे वस्ती परिसरातून जात होते. महापालिकेच्या क्रीडांगणाजवळ रिक्षा वळवत असताना समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराशी त्यांचा वाद झाला. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या आरोपींनी कुणाल जाधव, आदित्य घावरे आणि त्यांच्या साथीदारांनी शेख यांच्यावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून थेट गोळीबार केला. एवढेच नव्हे, तर त्यांना तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांची तत्परता
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कुणाल उर्फ नन्या जाधव, आदित्य घावरे, अक्षय जावळे आणि शिवाजी मरगळे या चौघांना शिताफीने बेड्या ठोकल्या. या टोळक्यातील इतर साथीदारांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. भररस्त्यात पिस्तूल काढून गोळीबार करण्यापर्यंतची मजल या गुन्हेगारांनी गाठल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.
