जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक केल्यानंतर शीतल तेजवानीला पुणे पोलीस आयुक्तालयात नेण्यात आलं.
पार्थ पवारांवरही जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप आहेत. दरम्यान, काल तेजवानीला अटक झाल्यानंतर
तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शीतल तेजवानी हिला पुणे पोलीस आयुक्तालयात आणलं. त्यानंतक थोड्याच वेळात शीतल तेजवानीला पुणे पोलीस कोर्टात हजर करण्यात आलं.
advertisement
शीतल तेजवाणीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?
शीतल तेजवानी प्रकरणी न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली. शीतल तेजवाणीची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, आम्ही पोलिसांच्या नोटिसीनुसार तपासात सहकार्य केलं, कागदपत्र दिली आहे. अटक करायची लेखी किंवा तोंडी कारणे कळवली नाहीत. अटक करणे किंवा न करण्याच्या कायदेशीर सूचनांच उल्लंघन करण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही अटक बेकायदा आहे. साडेतीन वाजता रिमांड रिपोर्ट दिलाय जे प्रोसिजरच उल्लंघन आहे . या प्रक्रियेच्या उल्लंघनाच्या अर्जावर आधी निर्णय व्हावा त्यानंतर रिमांड बाबतची सुनावणी करावी.
नेमकं काय घडलं कोर्टात?
दरम्यान युक्तिवाद सुरू असताना शीतल तेजवानीने न्यायालयात बसायला खुर्ची मागितली. न्यायालयानेही खुर्ची देण्याच्या सूचना दिल्याने न्यायालयात उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या.
सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला?
शीतल तेजवानी तपासात सहकार्य करत नाही , गुन्ह्यात षड्यंत्र कुणी रचलं त्याचा तपास करायचाय, असा युक्तिवात सरकारी वकिलांनी केला.
शीतल तेजवानीवर नेमका आरोप काय?
महाराष्ट्र शासनाच्या नावावर नोंद असलेल्या या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी शीतल तेजवानी यांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. शीतल तेजवानी आणि मूळ मालक गायकवाड कुटुंब आरोपांच्या घेऱ्यात आहे. शीतल तेजवानी ही जमीन गैरव्यवहारातील बडा मासा आहे. बनावट कागदपत्र तयार करून जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जमिनीचे बोगस कागदपत्र कुणी तयार केले असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 2014 ला न्यायालयाने तेजवाणी, मूळ मालकांचा दावा फेटाळला होता.
