बाणेर परिसरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला होता. विशेषतहा पॅनकार्ड क्लब रोड ते ननवरे चौक या मार्गावरील 24 मीटर डीपी रस्ता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे काही वर्षांपूर्वी पूर्ण झाला होता. मात्र, या मार्गाचा अखेरचा टप्पा म्हणजे ननवरे चौकाला जोडणारा अंदाजे 100 मीटरचा रस्ता कामाच्या टप्प्यातच अडकला होता. परिणामी या भागातील नागरिकांना आणि वाहनचालकांना बिटवाईज चौकातून मोठा वळसा घ्यावा लागत होता. यामुळे अतिरिक्त वेळ आणि इंधन खर्च होत होता.
advertisement
या समस्येबाबत नागरिक सातत्याने तक्रारी करत होते. त्यानंतर पालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले. त्यावेळी तत्कालीन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना देखील रस्ता मार्गी लावण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले.
पुढे चांदेरे यांनी विद्यमान आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन रस्त्याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर कामास अडथळा ठरत असलेल्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करण्यात आल्या. अखेर या रस्त्याचे काम सुरू झाले असून काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, हा रस्ता कार्यान्वित झाल्यानंतर बाणेर, ननवरे चौक आणि आसपासच्या भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच बिटवाईज चौकावरचा ताण हलका होईल आणि दैनंदिन प्रवासासाठी वेळेची मोठी बचत होईल. या भागातील रिअल इस्टेट विकासालाही गती मिळण्याची शक्यता आहे. या रस्त्याचे काम सुरू झाल्याने बाणेरकरांचा दीर्घकाळाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा महत्त्वाचा निर्णय झाला असून लवकरच या रस्त्याचा लाभ सर्वांना मिळणार आहे.