एका २३ वर्षीय तरुणीने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार, तिचा पती, सासू-सासरे, नणंद, नणंदेचा पती आणि चुलत सासरे यांच्यासह अन्य नातेवाइकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा विवाह १८ एप्रिल रोजी एका ३२ वर्षीय तरुणाशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनंतर पती नपुंसक असल्याचं तिच्या लक्षात आलं.
advertisement
Pune Accident : 8 वर्षानंतर घरात गोड बातमी; पण पीएमपीच्या धडकेनं सगळं संपवलं, जुळ्यांचा गर्भातच अंत
याबाबत तिने सासू-सासऱ्यांकडे विचारणा केली असता, तिला सहानुभूती मिळण्याऐवजी तिच्या छळाला सुरुवात झाली. सासरच्या मंडळींनी 'विवाहात मानपान केला नाही' असं कारण देत तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देणं सुरू केलं. त्याचबरोबर, त्यांनी माहेरून पैसे आणि सोने घेऊन येण्याची मागणी करत तिचा छळ केला. या गंभीर बाबी इथेच न थांबता, पती नपुंसक असल्याचं जर तिने कोणाला सांगितलं तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी सासू-सासरे आणि नातेवाइकांनी तिला दिली. इतकंच नाही तर, त्यांनी तिचे कोणा दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा खोटा आरोप करून तिची बदनामी केली. या सततच्या छळामुळे कंटाळून पीडित तरुणीने अखेरीस माहेरी येऊन समर्थ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. समर्थ पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
