नेमकी फसवणूक कशी झाली?
मांजरी परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. २०२० मध्ये त्यांची ओळख आरोपी संतोष सुरेश काकडे (लोणी काळभोर) आणि अतुल शामराव पवार (एरंडवणे) यांच्याशी झाली होती. "मेट्रोच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर पोलाद आणि सिमेंटची गरज आहे. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा नफा मिळेल," असे स्वप्न आरोपींनी फिर्यादी दाम्पत्याला दाखवले.
advertisement
आरोपींच्या आमिषाला बळी पडून या दाम्पत्याने वेळोवेळी तब्बल ३ कोटी ७८ लाख रुपये त्यांच्याकडे सुपूर्द केले. मात्र, महिने उलटूनही कोणताही परतावा मिळाला नाही. फिर्यादी महिलेने जेव्हा आपल्या हक्काचे पैसे परत मागितले, तेव्हा आरोपींनी आपला खरा चेहरा दाखवला. पैसे देण्याऐवजी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली आणि "तुमच्यावर सावकारीचा खोटा गुन्हा दाखल करू," अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांची कारवाई
लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मेट्रोच्या नावाखाली अशा प्रकारे मोठी गुंतवणूक करताना नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
