पुणेरी मेट्रोचा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), टाटा आणि सीमेन्स समूह यांच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत विकसित केला जात आहे. हा प्रकल्प माण, हिंजवडी ते शिवाजीनगर ह्या 23.3 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरमध्ये 23 स्थानके जोडेल. यामुळे पुण्यातील वाढत्या लोकसंख्येसाठी जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाचे काम सध्या सुमारे 90 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम अंतिम टप्यात आहे. याचे उद्दिष्ट मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणे आहे. प्रकल्पाची सुरुवात 25 नोव्हेंबर 2021 रोजी झाली होती.
advertisement
या प्रकल्पासाठी चार आधुनिक मेट्रो ट्रेन सेट्स उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन वातानुकूलित डबे आहेत आणि प्रत्येक गाडीची प्रवासी क्षमता अंदाजे 1,000 आहे. या गाड्या ताशी 80 किलोमीटर वेगाने धावू शकतात, ज्यामुळे प्रवास जलद आणि आरामदायक होईल.
मेट्रोच्या या चौथ्या चाचणीवेळी माण डेपोपासून म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलाजवळील स्थानक क्रमांक 10 पर्यंत मेट्रो धावली. या चाचणीवेळी गाडीचा वेग प्रतितास 40 किलोमीटर होता. चाचणीदरम्यान मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी आणि तंत्रज्ञ उपस्थित होते, ज्यांनी गाड्यांच्या कार्यप्रदर्शनाचे निरीक्षण केले. ही चाचणी भविष्यातील नियमित सेवा सुरू करण्याआधीच्या तयारीत महत्त्वाचा टप्पा आहे.
पुणेरी मेट्रो प्रकल्पामुळे केवळ माण-हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरच नव्हे, तर पुण्याच्या एकूण वाहतूक व्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होणार आहेत. प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि आधुनिक सुविधा मिळण्यास सुरुवात होईल. तसेच, विद्यमान मेट्रो मार्गांसह इंटरचेंज सुविधा उपलब्ध होणे शहरातील प्रवास अधिक सुलभ करेल. आगामी काळात या प्रकल्पाच्या पूर्ण झाल्यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुकर आणि आरामदायक होईल.
या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होईल आणि नागरी सुविधा सुधारण्यासाठी मोठा योगदान राहील. पुणेरी मेट्रोच्या कार्यान्वयनामुळे शहराच्या आधुनिकतेमध्ये वाढ होईल आणि नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक अधिक आकर्षक आणि विश्वासार्ह ठरेल.
