ससून रुग्णालयात घडला होता थरार
हे प्रकरण २५ ऑगस्ट २०२२ रोजी ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर घडलं होतं. लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला तुषार हनुमंत हंबीर (वय ३५, रा. हडपसर) हा चालता येत नसल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होता. त्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. तरीही, रोहित धोत्रेसह एकूण पाच आरोपींनी रुग्णालयात घुसखोरी केली. जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी हंबीरवर तलवार आणि कोयत्याने हल्ला चढवला.
advertisement
पोलिस गार्डवरही वार
या हल्ल्यात फिर्यादी हंबीरला वाचवण्यासाठी सरसावलेल्या पोलीस गार्ड आणि हंबीरच्या मेहुण्याच्या हातावरही आरोपींनी वार करून त्यांना जखमी केलं. याचवेळी एका आरोपीने पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्नही केल्यानं रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते.
शिकवणी वर्ग संपवून रात्री घरी निघालेली शिक्षिका; चोरट्यांनी रस्त्यात गाठलं अन्..., कोंढव्यातील घटना
११ आरोपींना अटक
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी एकूण १२ आरोपी निष्पन्न केले होते. त्यापैकी ११ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली. सर्व आरोपींवर 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, गुन्हा घडल्यापासून मुख्य आरोपींपैकी एक असलेला रोहित ऊर्फ तम्मा धोत्रे हा पोलिसांना सापडत नव्हता.
केसनंद परिसरात सापळा रचला
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी संगिता शिंदे अल्फोन्सो, वपोनि संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीचा शोध सुरूच ठेवला होता. गोपनीय माहितीनुसार, अंमलदार ज्ञानेश्वर बडे आणि मनोज भोकरे यांना धोत्रे हा केसनंद परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने तात्काळ सापळा रचून तीन वर्षांपासून फरार असलेल्या तम्मा धोत्रेला ताब्यात घेतले आहे. यामुळे या गंभीर गुन्ह्यातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
