सध्या शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. विद्युत, ड्रेनेज, शहरी दळणवळण, स्मार्ट सिटी कंपनी तसेच मोबाईल नेटवर्किंग कंपन्यांकडून सातत्याने खोदकाम केले जात आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर योग्य पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे आणि काँक्रीट रस्त्यांवर भेगा पडत आहेत.
थंडीचा कडाका वाढला, पिंपरी-चिंचवडमध्ये शाळेच्या वेळा बदलल्या, पाहा नवं वेळापत्रक
advertisement
अडीच लाखांपर्यंत भरपाई
या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचारी यांना अपघातांचा सामना करावा लागत असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही ठिकाणी जीवघेणे अपघातही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जखमी व्यक्तीस 50 हजार ते 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत तर मृत्यू झाल्यास वारसांना 5 लाख रुपये मोबदला देण्यात येणार आहे. हा निर्णय 13 नोव्हेंबर 2025 नंतर झालेल्या अपघातांवर लागू राहणार आहे.
जबाबदारी निश्चित करणार
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान अपघातास महापालिका, ठेकेदार किंवा अन्य कोण जबाबदार आहे, याची सखोल तपासणी केली जाईल. ठेकेदार दोषी आढळल्यास त्यांच्याकडून भरपाईची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासनावर दबाव वाढणार असून नागरिकांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इथं करा अर्ज
पुणे महानगरपालिका हद्दीतील महानगरपालिकेमार्फत विकसित केलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास जखमी व्यक्ती किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक महापालिकेच्या पथ विभागाकडे अर्ज सादर करू शकतात. शिवाजीनगर येथील पथ विभाग कार्यालयात आवश्यक सर्व पुराव्यांसह पुणे महानगरपालिका, पथ विभाग, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे-411005, (फोन नं. 020-25501084, Email id - road@punecorporation.org) याठिकाणी सर्व पुराव्यानिशी अर्ज सादर केल्यानंतर, महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीमार्फत चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.






