शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत याने 12 ऑक्टोबर 2021 रोजी एकतर्फी प्रेमातून राष्ट्रीय कबड्डी खेळाडूवर हल्ला केला. चाकू व कोयत्याच्या 22 वारांमुळे तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले होते. आता 4 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅड. हेमंत झंजाड यांनी काम पाहिले. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर व अमानुष स्वरूपाचा असल्याने त्याला मृत्युदंड देण्यात यावा, अशी मागणी सरकारी पक्षाने केली होती. आरोपीविरोधात साक्षीदारांच्या साक्षी, शवविच्छेदन अहवाल तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील विविध निकालांचा आधार न्यायालयासमोर मांडण्यात आला.
advertisement
पुण्यात खड्ड्यामुळं अपघात? आता गप्प राहायचं नाही, इथं अर्ज करायचा, मिळेल भरपाई
मृत्यूदंड नाहीच
शवविच्छेदन अहवालानुसार मृत मुलीच्या शरीरावर तब्बल 25 छेदलेल्या जखमा आढळून आल्या होत्या. न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या कलम 302 अंतर्गत आरोपी दोषी ठरवला. या कलमानुसार मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा अशा दोनच शिक्षा आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, जन्मठेप ही नियमाची शिक्षा असून मृत्युदंड हा अपवादात्मक आहे.
हा गुन्हा अत्यंत क्रूर असला तरी तो दुर्मिळातील दुर्मीळ या श्रेणीत मोडतो असे म्हणणे कठीण असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे आरोपीला मृत्युदंड देणे योग्य ठरणार नाही, असे मत व्यक्त करत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या निकालावर प्रतिक्रिया देताना अॅड. हेमंत झंजाड म्हणाले, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाल्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. या निर्णयामुळे समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. महिलांना कायद्याचा मजबूत आधार आहे, हे या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या निकालामुळे एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात कठोर संदेश गेला असून, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी समाजानेही जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






