नेमकी घटना काय?
गेल्या महिन्यात २६ डिसेंबर रोजी कोंढवा परिसरात एका टोळक्याने उच्छाद मांडला होता. सोहेल नवाज शेख उर्फ पठाण (वय २५) आणि सादिक शेख हे त्यांच्या १० ते १२ साथीदारांसह दुचाकीवरून परिसरात आले. या टोळक्याने हातांत तीक्ष्ण शस्त्रे नाचवत नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "आम्ही मकोका (MCOCA) मधून बाहेर आलो आहोत, इथले दादा आहोत," असे ओरडत त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण केली.
advertisement
या टोळक्याने केवळ धमकावूनच थांबले नाही, तर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. नागरिकांनी पोलिसांत तक्रार करू नये यासाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सूरज शुक्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींचा शोध कोंढवा पोलीस घेत होते. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल पठाण आणि सादिक शेख या दोघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांचे इतर १० ते १२ साथीदार अजूनही पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गावडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे की, अशा प्रकारे दहशत माजवणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
