54 किमी मार्गाचा भूमिगत बोगदा तयार केला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पुण्यात आता एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि बोगद्यांवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. शहरातल्या प्रमुख 32 रस्त्यांवर सध्या क्षमतेपेक्षा सुमारे अडीच पट अधिक वाहतूक होत असल्याने या मार्गांवरील ताण कमी करणे अत्यावश्यक बनले आहे. यासाठी 23 नव्या उड्डाणपुलांसह 56 बोगद्यांची उभारणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्यासाठी सुमारे 32 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला सरकारकडून मान्यता देण्यात आली आगे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पुणेकरांच्या दैनंदिन वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणारा ठरण्याची शक्यता आहे.
advertisement
हा भूमिगत बोगदा कात्रजसह औंध, संगमवाडी, कोथरूड आणि सिंहगड रोड यांसारख्या भागांना जोडणारा आहे. सर्वाधिक वर्दळ असलेल्या भागांना जोडणारा मार्ग तयार झाल्यानंतर पुणे शहरातली बरीच वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त केला जात आहे. पुणे शहरातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटता सुटत नाहीये. अनेक प्रवासाचे मार्ग काढले असले तरीही वाहतूक कोंडी फुटण्याचं नाव घेत नाहीये. उपमुख्यमंत्री पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी काढण्यासाठी एकूण 56 बोगदे बांधत आहेत. लवकरच पुणेकरांची ट्रॅफिकची कोंडी सुटणार असल्याचं विधान उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
येरवडा ते कात्रज दरम्यानचा प्रवास लवकरच भूमिगत थेट आणि वेगवान होणार आहे. या महत्वाकांक्षी योजनेचा प्राथमिक प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याला मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित भूमिगत बोगदा थेट रिंग रोडशी जोडले जाणार असल्याने, शहरातून जाणारी महामार्गावरील वाहतूक आता शहराच्या हद्दीत येणार नाही. परिणामी पुण्यातील वाहतुकीचा सुमारे 40 टक्के ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. कात्रज घाटात सध्या भोगावा लागणारा वेळखाऊ आणि त्रासदायक प्रवास या बोगद्यांमुळे सुकर होणार असून, उत्तर ते दक्षिण पुणे काही मिनिटांत जोडले जाणार आहे. रिंग रोडसह हे भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल पुण्याच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा मजबूत पाया ठरणार आहेत.
शहराच्या उत्तर- दक्षिण भागांना जोडणारे तब्बल 56 बोगदे सुमारे 54 किलोमीटर लांबीचे असतील. वाहतूक जलद आणि सुरळीत करण्यासाठी 23 नवीन उड्डाणपूल उभारले जाणार असून, त्यापैकी काहींची कामे आधीच सुरू झाली आहेत. शहरातील 32 प्रमुख रस्त्यांवर क्षमतेपेक्षा दीड ते अडीच पट वाढलेला वाहतुकीचा भार या प्रकल्पामुळे लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. यासोबतच थ्री-लेअर ट्रॅफिक संकल्पनेनुसार, खाली रस्ता, मधोमध वाहतूक कॉरिडॉर आणि वर मेट्रो असा समन्वित आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामुळे पुण्याची वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि गतिमान होणार आहे.
